महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी उत्पन्न बाजार समितीत तुफान गर्दी; कोरोना नियमांचा फज्जा

गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन आणि प्रशासनाने अथक परिश्रम करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन देखील करण्यात आले. पुणे शहरात मिनी लॉकडाऊन लावलेला आहे. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाच्या सर्व निर्बंधांना हरताळ फासला जात आहे.

Pune APMC latest News
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बातमी

By

Published : Apr 12, 2021, 10:31 AM IST

पुणे - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यामध्ये रूग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊनही जाहीर केला होता. मात्र, हा विकेंड लॉकडाऊन संपताच पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळपासूनच तुफान गर्दी झाली. या गर्दीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेल्याचे चित्र बाजार समितीमध्ये पाहायला मिळाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना नियमांचे पालन होत नाही

दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊननंतर फळ आणि भाज्या खरेदी करण्यासाठी मार्केटयार्डमध्ये घाऊक आणि किरकोळ ग्राहकांनी मोठी गर्दी केली. या गर्दीत कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. काहींचे मास्क हनुवटीवर तर काहींनी मास्क घातलेच नसल्याचे चित्र दिसले. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दिवाळीची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती. त्यानंतर कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच चित्र पुन्हा एकदा दिसून येत आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती..

राज्यात 34 हजार 8 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 27 लाख 82 हजार 161रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण 34 लाख 7 हजार 245 रुग्णांची नोंद झाली असून सध्या राज्यात एकूण 5 लाख 65 हजार 587 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

हेही वाचा -'बेस्ट'..! ९५ टक्के कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात, ३ महिन्यांत ३८७ कर्मचारी बाधित

ABOUT THE AUTHOR

...view details