पिंपरी-चिंचवड (पुणे) - पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयातून 45 वर्षीय कोरोनाबाधित महिलेने पलायन केल्याची घटना बुधवारी (दि. 8 जुलै) घडली होती. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित महिलेला पुन्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांना यश आले होते. दरम्यान, संबंधित महिला आणि तिचा 15 वर्षीय मुलालाही कोरोना झाल्याने ती मानसिक तणावात वावरत आहे. मुलाची काळजी वाटत असून स्वतः देखील कोरोनाबाधित असल्याने ती घाबरली होती, याच मानसिक तणावातून तिने पळ काढला होता, अशी माहिती खासगी रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
मानसिक तणावातून 'त्या' महिलेने केले होते रुग्णालयातून पलायन - तळेगाव दाभाडे बातमी
तळेगाव दाभाडे येथील एका 45 वर्षीय महिलेला व तिच्या 15 वर्षीय मुलाला कोरोना झाला असून दोघांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे मुलाच्या चिंतेने व कोरोनाच्या भीतीने ती महिला सतत मानसिक तणावात जाते. बुधवारी याच मानसिक तणावातून त्या महिलेने रुग्णालयातून पळ काढला होता. दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर तिला पुन्हा रुग्णालयात नेण्यास प्रशासनाला यश आले.
दरम्यान, महिलेला बोलण्यात गुंतवून पाठीमागून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पकडले. तरी देखील महिला ही रुग्णालयात जाण्यास नकार देत होती. तिच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात 35 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर तिच्या मुलावर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. संबंधित महिला अधूनमधून मानसिक तणावात जाते, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले आहे.
कोविड रुग्णांना वाळीत टाकू नका, कोरोनाग्रस्त रुग्णांना नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्यांना माणसांमध्ये, समजात सहभागी करून घेतले पाहिजे. सामाजिक बांधिलकी म्हणून कोविड रुग्णांना सांभाळून घेतले पाहिजे. तस न केल्यास रुग्ण मानसिक तणावाखाली जातात. त्यामुळे त्यांच्याशी नेहमीप्रमाणे संभाषण करा, असे आवाहन मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. दिलीप प्रतापराव भोगे यांनी केले आहे.
हेही वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये 587 कोरोनाबाधितांची नोंद;11 जणांचा मृत्यू