पुणे- जिल्ह्यात अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या 41 वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. या महिलेचे प्रकृती उत्तम असल्यामुळे ती ठणठणीत बरी होऊ शकली, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. मंगळवारी या महिलेला व्हेंटिलेटरवरून (कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणा) काढण्यात आले. तब्बल 10 दिवस ही महिला अतिदक्षता विभागामध्ये होती.
अंगणवाडी सेविकेची कोरोनावर मात - पोटावर झोपवून केले व्हेंटिलेशन
डॉ. संजय ललवाणी यांनी सांगितल्यानुसार, ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सरकारच्या वैद्यकीय नियमावलीनुसार तिच्यावर उपचारास सुरुवात झाली. या महिलेला न्यूमोनिया असल्याने थोडी भीती होती. पण आम्ही आव्हान स्वीकारत उपचार करण्यास सुरुवात केली. एरव्ही व्हेंटिलेशन करताना रुग्णाला पाठीवर झोपवले जाते. पण या महिलेला पोटावर झोपवून व्हेंटिलेशन देण्यात आले. 6 तास पोटावर आणि 6 तास पाठीवर झोपवून तिच्यावर उपचार करण्यात आले. अखेर हळूहळू ती या आजारातून बाहेर पडली. मंगळवारी तिला व्हेंटिलेटरवरवरून काढण्यात आले. सध्या ही महिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून लवकरच तिला डिस्चार्ज देण्यात येणार आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
ही महिला वेल्हा तालुक्यात अंगणवाडी सेविका असल्यामुळे तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच वेल्हा तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. वेल्हे तालुक्यातील अनेक गावांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले होते.