चाकण (पुणे) -चाकण औद्योगिक वसाहतीला पुन्हा कोरोनाचे ग्रहण लागले आहे. चाकणमधील एका नामवंत कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराला कोरोनाची लागण झाली आहे. या कामगाराच्या संपर्कात आलेल्या सात व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना महाळुंगे येथील कोविड रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात येणार आहे. ही माहिती पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे व तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे यांनी दिली.
चाकण औद्योगिक वसाहतीतील एका नामवंत कंपनीच्या कामगाराला कोरोनाची लागण - पुणे लेटेस्ट न्यूज
चाकण औद्योगिक वसाहतीमधील एका कामगाराला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामगाराच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे.
चाकणमधील नामवंत कंपनीतच कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खेड तालुक्यातील कडुस येथील एका कामगाराला कंपनीत काम करत असताना त्रास जाणवू लागल्याने त्याचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली. तपासणी अहवालात त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामगारांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ क्वारंटाइन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये लॉकडाऊनमध्ये काही नियम व अटींना शिथिलता देऊन कंपन्या सुरु करण्यात आल्या आहेत. ३० टक्के कामगारांवर सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करुन चाकण औद्योगिक वसाहतीत २५० पेक्षा जास्त लहान मोठ्या कंपन्या सुरू आहेत.