शिरुर (पुणे) -दिवाळी म्हटले की, दिव्यांचा सण! या दिवाळीत नागरिक आपल्या घरात, अंगणात दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई करून परिसर प्रकाशमय करतात. पण, हेच दिवे बनवणाऱ्या बचत गटातील महिलांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. सात महिन्यांपासून कर्जाचा डोंगर डोक्यावर घेत मेहनत करून बनवलेल्या वस्तू विक्रीविना पडून असल्याने नफा नको, मात्र किमान गुंतवलेले भांडवल मिळू द्या, अशी म्हणण्याची वेळ आता या महिलांवर आली आहे.
नफा नको, किमान गुंतवणूक तरी मिळू द्या, महिला बचत गटाची व्यथा शिरुर तालुक्यातील परिसरात शेकडो दगडखाण कामगार महिला उदरनिर्वाह करण्यासाठी संतुलन महिला संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या क्रांती बचत गटात वीस वर्षांपासून काम करत आहेत. दगडखाणीवर काम करणाऱ्या महिलांना टाळेबंदीमुळे काम नव्हते. त्यामुळे रक्षाबंधनला राखी, नवरात्रीला दांडिया, दिवाळीला भेटकार्ड, दिवे, आकाश कंदिल, रांगोळी, पणत्या तयार केल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे दिवाळीच्या तोंडावर महिलांनी तयार केलेल्या मालाला मागणी मिळत नसल्याने संपूर्ण माल पडून आहे. यामुळे मोठ्या आर्थिक संकटात महिला सापडल्या आहेत.
दिवाळीला महिलांचे दिवाळे
प्रत्येक वर्षी सण-उत्सवात लागणाऱ्या वस्तूंना चांगली मागणी मिळत असल्याने यंदाही चांगला प्रतिसाद मिळेल, या आशेने क्रांती महिला बचत गटातून कर्जस्वरुपात भांडवलाची उभारणी करून दिवाळीला भेटकार्ड, दिवे, आकाश कंदिल, रांगोळी, पणत्या तयार केल्या. मात्र, सध्या दिवाळी सण तोंडावर आला असून बाजारातून व्यापारी, दुकानदार मालाची मागणी करत नाहीत. त्यामुळे यंदाचा दिवाळी सण साजरा केला जातो की नाही, अशी शंका असल्याने महिलांना मोठी चिंता लागली आहे.
मागणी नसल्याने ऐन दिवाळीत दिवाळे निघण्याची भीती
मागील सात महिन्यांपासून दगडखाणीवर काम करणाऱ्या महिलांचे टाळेबंदीमुळे काम बंद झाले होते. कुटुंबाचा दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण करायचे, कसे असा प्रश्न असताना दिवाळी तोंडावर महिलांनी बचत गटातून कर्ज घेऊन दिवाळीसाठी स्वतःच्या हाताने वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या, तर काही महिलांनी दिवाळीचा फराळ तयार केला आहे. मात्र, सध्या या मालाला कुठूनच मागणी येत नसल्याने ऐन दिवाळीत दिवाळेच निघणार असल्याची भीती महिलांना सतावत आहे. बचत गटातून घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा, गंभीर प्रश्न या महिलांसमोर उभा ठाकला आहे.
हेही वाचा -आता गिर्यारोहणही होतेय 'अनलॉक'; पुणे जिल्ह्यात सशर्त परवानगी