पुणे : राज्यात आजपासून एसटी महामंडळाची लालपरी पूर्ण क्षमतेने धावत आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून लालपरीचे सारथ्य करणारे चालक-वाहक हे आर्थिक संकटात सापडलेले आहेत. आता तर हे संकट आणखीनच गंभीर होत चालले आहे.
एसटीचे उत्पन्न वाढावे, यासाठी एसटी परिवहन महामंडळाकडून अनेक उपाययोजना सुरू करण्यात आल्या. त्यात एसटीमधून मालवाहतूकही सुरू झाली. मात्र, मालवाहतूक करणाऱ्या चालक-वाहकांची अवस्था फारच बिकट झाली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात माल घेऊन गेल्यानंतर पाच ते सहा दिवस या चालक-वाहकांना बसमध्येच राहावे लागत आहे. ना कुठला भत्ता ना झोपायची सोय अशी अवस्था या चालकांची झाली आहे. सध्या राज्यात एसटी म्हणजे लालपरीचे सारथ्य करणाऱ्या चालक-वाहकांची संख्या 70 हजारांच्या पुढे आहे. तर, आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटीला कर्मचाऱ्यांचे पगारही दोन महिन्यांपासून देण्यात आलेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलगीकरण करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जाते आहे.