पुणे - राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुणे शहरातही उन्हाची तीव्रता वाढत असून या उन्हाचा चटका माणसांबरोबरच प्राण्यांनाही बसत आहे. यामुळेच कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात कूलिंग व्यवस्था बसविण्यात आली आहे. तसेच स्प्रिंकलर, कुलर, फॉगर सुरू करण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांसाठी दरवर्षी प्राणी संग्रहालय अशी व्यवस्था करत असते.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयातर्फे येथील वन्यप्राण्यांचा उन्हाच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी विविध उपाय राबविले जात आहे. यामध्ये प्राण्यांच्या गुहेत कूलर बसविणे, वॉटरगनद्वारे भिंतीवर पाण्याचा शिडकावा करणे, खंदकांमध्ये पाण्याचा साठा करणे तसेच चिखलांच्या खड्ड्यांची व्यवस्था करणे, असे विविध उपाय करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त पिंजऱ्यांमध्ये पाण्याचा फवारा करणारे फॉगरदेखील बसविण्यात आले आहेत.