स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात संविधान शिक्षणाचा उपक्रम पुणे : आपल्या देशात शाळांमध्ये शैक्षणिक शिक्षण बरोबरच विविध खेळ तसेच नृत्य आणि विविध ॲक्टीव्हीटी या शाळांमध्ये शिकवल्या जातात. पण जर आपल्याला कोणी म्हटल की शाळेत लहान मुलांना संविधान देखील शिकवले जाते. तर आपला विश्वास बसणार नाही. कारण जो देश संविधानानेच चालतो त्या देशात नागरिकांना खरंच संविधान माहित आहे का ? आपले हक्क, कर्तव्य यांची जाणीव आहे का ? असा प्रश्न नेहमी पडतो. पण या प्रश्नाला पुणे जिल्ह्यातील भोर तालुका ( Pune Constitution education ) हा अपवाद ठरला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी 15 ऑगस्ट 2021 पासून संविधान शिक्षण ( Constitution education in Bhor ) सुरू करण्यात आले आहे.
शाळेत शिकवल जाते संविधान : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त भोर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 274 शाळेतील इयत्ता 3री ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 15 ऑगस्ट 2021 पासून संविधान शिक्षण सुरू करण्यात आले आहे. संविधान शिक्षण देण्यासाठी सोप्या व रंजक कृतीआधारित पाठ्यक्रम आणि हस्तपुस्तिका तयार केली असून तब्बल 9,711 विद्यार्थी संविधान शिक्षण घेत आहेत.
असे दिले जाते शिक्षण : भोर तालुक्यातील 274 जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी 'शालेय संविधान' तयार केले असून यात विद्यार्थ्यांनी वर्गासाठीचे, खेळासाठीचे, मध्यान्ह भोजनासाठीचे, सहलीसाठीचे, सांस्कृतिक कार्यक्रमासाठीचे व तंटामुक्तीचे नियम तयार केले असून त्यानुसार सर्व विद्यार्थी आचरण करीत आहेत. विविध कृतींच्या माध्यमातून मिळालेल्या संविधान शिक्षणामुळे शाळेत, कुटुंबात व गावात दैनंदिन जीवन जगताना विद्यार्थी संवैधानिक मूल्यांचा अवलंब करत आहे. परंपरेने चालत आलेली स्त्रियांची कामे जसे- झाडू मारणे, भांडी घासणे, कपडे धुणे, घरकामात आईला मदत करणे अशी कामे करताना मुलांना संकोच वाटत नाही. मुलींनाही आपले अधिकार व कर्तव्य याबाबत जागरूकता आली आहे.
विद्यार्थी निर्भयपणे मते मांडतात :शैक्षणिक वर्ष 2021- 22 मध्ये लॉकडाऊनमध्ये शाळा बंद असलेल्या कालावधीत कृतीपत्रिकेच्या माध्यमातून संविधान शिक्षण देण्यात आले. यास विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये संविधान शिक्षण अधिक नियोजनबद्धरीत्या देण्यासाठी शिक्षकांच्या अभ्यास गटाने सात महिने अभ्यास करून सोप्या व रंजक कृतीआधारित 'संविधान शिक्षण हस्तपुस्तिका' विकसित केली. जुलै 2022 मध्ये सर्व शिक्षकांना संविधान प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांना संविधान शिक्षण नेमके कसे द्यायचे आहे याची परिपूर्ण दिशा शिक्षकांना मिळाली.यामुळे विद्यार्थी निर्भयपणे आपली मते शाळेत, कुटुंबात व गावात मांडू लागली आहेत. मुलांच्या मतांचा स्वीकार शाळेत, कुटुंबात व गावात होताना आढळत आहे. शाळेत, कुटुंबात व गावातील निर्णय प्रक्रियेत विद्यार्थी भाग घेत आहेत.
यामुळे उपक्रमाची सुरूवात : स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी वर्षात नक्की खरे स्वातंत्र्य म्हणजे काय संविधानाने आपल्याला काय हक्क दिले आहेत. आपले देशाप्रती कर्तव्य काय आहेत. याच्याबद्दल आपण मुलांच्या मनात जाणीव रुजवली पाहिजे. या उद्देशाने हा उपक्रम सुरु झाला. सजक नागरिक घडवणे हा जर शिक्षणाचा मुख्य उद्देश असेल तर आपण लहानपणापासूनच मुलांना संविधानाचे धडे शिकवायला हवेत. जर देश संविधानिक मूल्यांवर चालतो तर संविधान याच वयात मुलांना शिकवले पाहिजे असे वाटले आणि हा उपक्रम सुरु केला. दुसरीकडे, प्रत्यके नागरिकांच्या दैनंदिन जीवनात संविधानिक मूल्यांचा वापर होत असतो. संविधान हे फक्त कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी, प्रशासन चालवणारे अधिकारी यांच्यापुरतंच मर्यादित नसून देशातील प्रत्येक नागरिकाला आपले जीवन जगायला संविधान उपयुक्त आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला संविधान शिक्षण मिळायला हवे, असे यावेळी भोर तालुक्यात गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी सांगितले.
संविधान शिक्षणाची सुरुवात : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2021 पासून पंचायत समिती भोर अंतर्गत 274 जिल्ही परिषद शाळातील विद्यार्थ्यांना संविधान शिक्षण Covid-19 लॉकडाऊन कालावधीत सुरू करण्यात आलेल्या Integrated Learning worksheet मध्ये QR कोड दूवारे व्हिडिओच्या माध्यमातून संविधान शिक्षण व त्यावर आधारित रंजक कृतीची रचना यास विद्यार्थी, शिक्षक, पालक व पर्यवेक्षीय यंत्रणेचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
संविधान शिक्षण उपक्रम यशोगाथा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामथडी येथील वर्गशिक्षिका रत्नमाला निगडे यांनी मार्गदर्शन करताना वैष्णवी मांढरे या विद्यार्थिनीला शिक्षणाचा हक्क नीट कळाला. सुट्टीत आपल्या शेजारच्या शेतावर कामासाठी आलेल्या कुटुंबातील आपल्याच वयाची तीन मुले कोणत्याही शाळेत जात नाहीत हे तिने पाहिले व त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव येथील विद्यार्थिनींना मत स्वातंत्र्य व निर्णय प्रक्रियेतील सहभागाचे महत्व पटले. त्यामुळे तिने कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत सहभाग घेऊन स्वतःसाठी वेगळ्या साबणाची मागणी केली. तिच्या पालकांनी तिचे मत स्वीकारून महिन्याच्या किराण्यात मुलांसाठी वेगळा साबण आणने सुरुवात केली. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत पालक आपल्या मुलांना सहभागी करून घेत आहेत.
विद्यार्थ्यांचा उपक्रम : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरी येथील शंभूराज लेकावळे या विद्यार्थ्याने पिढ्यानपिढ्या खाचरामध्ये भात लागवड केली जाते त्याऐवजी दूसरे पीक घ्या असा आग्रह धरला. दुसरे पीक कोणते लावायचे ते घरच्यांनी विचारले आणि शंभुराज याने सांगितल्याप्रमाणे सोयाबीन लावले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोलावडे येथील विद्यार्थिनी अनुष्का कांबळे ही शाळेत मिळणाऱ्या संविधान शिक्षणातील विविध संकल्पनाबाबत कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करते. स्त्री पुरुष समानता यावरील चर्चेतून प्रेरित होऊन तिचे बाबा थोडा वेळ काढून दररोज घरकामात आईला मदत करू लागले.
- संविधान शिक्षणाचा उद्देश :
1. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे.
2. जबाबदार व संवेदनशील नागरिक घडवणे
3. विद्यार्थ्याच्या मनात राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय प्रतीकांबाबत आदर निर्माण करणे.
4. संविधानातील मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्याच्या मनामध्ये करणे.
5. माझ्या देशाचे संविधान माझ्यासाठी आहे ही जाणीव विकसित करणे.
6. भारत देशातील विविधतेतून राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे.
7. लोकशाही शासन व्यवस्था व विविध प्रशासकीय यंत्रणेवरील विश्वास वृद्धिंगत करणे.
8. बालकेंद्रीत शाळा बनवून आनंददायी शिक्षण देणे.
- संविधान शिक्षणाचे स्वरूपः
1. इ. 3री ते 7 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संविधान शिक्षण.
2. संविधान शिक्षण पाठ्यक्रम व हस्तपुस्तिकेची निर्मिती.
3. वार्षिक, मासिक, साप्ताहिक व दैनंदिन अध्ययन अध्यापनाचे नियोजन.
4. प्रत्येक महिन्यातील तीन आठवडे व प्रत्येक आठवड्यातील तीन दिवस संविधान शिक्षण.
5. घटक परिचयासाठी किंवा आर कोड व व्हिडिओची निर्मिती.
6. विद्यार्थ्याच्या क्षमतेनुरूप सोप्या व रंजक कृती आधारित पाठ्यक्रम.
7. सामायिक विशेष उपक्रम, विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन.