पुणे :संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज बालगंधर्व चौकामध्ये दुग्धाभिषेक करण्यात येणार होता. त्यासाठी त्यांच्या समर्थकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. परंतु पोलिसांनी अमित शाह यांच्या दौऱ्याचे कारण देत ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे संभाजी भिडे समर्थकांनी आज जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन दिले. त्यात संभाजी भिडे गुरुजींची बदनामी आणि अपप्रचार थांबवावा, अशी मागणी केलेली आहे. त्यांच्याविरूद्ध कारस्थान रचले जात आहे. त्या कारस्थानाच्या पाठीमागे असणाऱ्या लोकांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
संभाजी भिडे समर्थकांची सामूहिक प्रार्थना :संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ बालगंधर्व चौकात दुग्धाभिषेक करण्यात येणार होता. परंतु त्या विरोधात पुण्यातील भीम आर्मी संघटनेने काळे फासण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता संभाजी भिडे समर्थक मोठ्या प्रमाणात पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी आले होते. या ठिकाणी त्यांनी सामूहिक प्रार्थना केली. शांततेच्या मार्गाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी केलेली आहे.
संभाजी भिडे समर्थकांचे आंदोलन :संभाजी भिडे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर जमा झाले आहेत. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्तसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन संपवले जाईल, अशी माहिती भिडे समर्थक कार्यकर्त्यांनी दिली होती. संभाजी भिडे हे सातत्याने महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे विविध राजकीय पक्ष हे त्यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत.