पुणे : सरकारने आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे वृत्त विभागाची जबाबदारी आता औरंगाबाद येथील आकाशवाणी केंद्रांवर सोपवण्यात येणार आहे. पुण्यातील वृत्त विभागच बंद पडत असेल, तर छत्रपती संभाजीनगरपर्यंत बातम्या कशा पाठवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांना देशांच्या जनतेसोबत बोलण्यासाठी मन की बात करावी लागते. मात्र, ज्या माध्यामातून पंतप्रधानांचा कार्यक्रम प्रसारीत केला जातो ते माध्यमच बंद करण्यात येत आहे. मोदी सरकारला नऊ वर्षात काही करता आले नाही मात्र, सरकार स्वायत्त संस्थेवर गदा आणत आहे अशी टीका तीवारी यांनी केली आहे.
जनतेच्या हितासाठी या बातम्या जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मात्र, मोदी सरकार सगळ्या स्वायत्त संस्थेवर गदा आणत आहे. अवघ्या नऊ वर्षात सरकारला याशिवाय काही करता आले नाही. या राज्यातले प्रोजेक्ट गुजरातला पळवण्याशिवाय दुसरे कोणते काम सरकारने केले - गोपाळ तिवारी, काँग्रेस प्रवक्ते
प्रादेशिक वृत्त विभाग 19 जून रोजी बंद :केंद्रीय प्रसार भारती धोरणात्मक निर्णय घेत असल्याने त्याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग 19 जून रोजी बंद होत आहे. आता या विभागाचे काम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित केले जाईल, असे आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल यांनी सांगितले. आकाशवाणी पुणे केंद्रातून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पहिले बातमीपत्र सादर केले जाते. त्यानंतर आठ वाजून ५८ मिनिटांनी तसेच अकरा वाजून ५८ मिनिटांनी, तसेच सायंकाळी सहा वाजून ५८ मिनिटांनी बातमीपत्रे सादर केली जातात. आता प्रसार भारतीने पुण्यातील सर्व कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथून प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.