पुणे : कसबा पोट निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून काल भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रास्ते यांनी अर्ज दाखल केला आहे. तर, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्हीही पक्षाकडून बंडखोरी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे. मात्र, नाराज इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण असे असले तरी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांनी काँग्रेसमधून बंड पुकारले असून त्यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
काँग्रेसमधून बंड :पुणे शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर हे काँग्रेसकडून इच्छूक होते. त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली होती. पण पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने बाळासाहेब दाभेकर यांनी काँग्रेसमधून बंड पुकारले आहे. आज कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज सकाळी त्यांच्या कार्यालयातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यासाहित दुचाकी वाहनांच्या रॅली काढण्यात आली. ही रॅली नारायण पेठेतील मोदी गणपती मंदिरापासून सुरू झाली. तेथून पुढे केसरीवाडा गणपती, दगडूशेठ गणपती मंदिर मार्गे गणेश कला क्रिडा रंगमंचाच्या सभागृहाजवळ समाप्त झाली आहे.