जळगाव - पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला करत सर्जिकल स्ट्राइक केला. या कारवाईची माहिती रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून अर्णब गोस्वामी यांना अटक करण्याची मागणी करत जळगावात जिल्हा काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी गोस्वामी यांच्यासह मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शनेदेखील केली.
हा देशद्रोहाचा प्रकार
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडे देशाच्या सुरक्षिततेच्या संदर्भातील माहिती असणे हा देशद्रोहाचा प्रकार आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून गोस्वामी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसकडून देशभरात आंदोलन पुकारण्यात आले आहे. जळगावात देखील आज (शुक्रवारी) दुपारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने तसेच धरणे आंदोलन करण्यात आले.
गोपनीयतेच्या कायद्यान्वये कारवाईची मागणी
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झालेल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामी यांना घटनेच्या तीन दिवस आधीच होती, असे या संभाषणातून स्पष्ट होते. देशाच्या संरक्षणविषयक महत्त्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर आहे. तसेच गोस्वामी यांनी सांगितल्यानुसार ही माहिती दिली, ती मोदी सरकारमधील मोठी व्यक्ती आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची करण्यात यावी. अर्णब गोस्वामी यांचे हे कृत्य ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट १९२३ सेक्शन ५ नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच; पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे, म्हणून अर्णब गोस्वामी यांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
'गोस्वामींच्या इतर घोटाळ्यांचीही चौकशी करा'
अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केले असून, दूरदर्शन सॅटेलाइटची फ्रिक्वेन्सी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसानही केले आहे. रिपब्लिक टीव्हीने दूरदर्शनला पैसे न देता त्यांच्या फ्रिक्वेन्सी वापरणे हा गुन्हा आहे. टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी करावी. दूरदर्शन तसेच माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असता राठोड यांनी ती तक्रार दुर्लक्षित केली आहे, असे या संभाषणातून दिसून येत आहे. याचा अर्थ मोदी सरकारचा गोस्वामीला पाठिंबा आहे आणि जनतेचा पैसा लुबाडणाऱ्या अर्णब गोस्वामीविरोधात केंद्र सरकार तत्काळ कारवाई करीत नसल्याचा आरोपदेखील काँग्रेसने यावेळी केला आहे. या प्रकरणात गोस्वामीला मदत करणाऱ्या उच्चपदस्थांवरदेखील तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
मोदी सरकार विरोधातही घोषणाबाजी
यावेळी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना गोस्वामी यांना अटक झालीच पाहिजे, मोदी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय, अशी घोषणाबाजी करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, प्रदेशचे उपाध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटी, प्रदेश चिटणीस डी. जी. पाटील, एसएनयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.