पुणे : विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले असते तर कदाचित महाविकास आघाडी सरकार अजूनही टिकले असते, असे संजय राऊत म्हणाले होते. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, मी किती शक्तिवान आहे याची प्रशंसा संजय राऊत यांनी केली आहे. माझ्या शक्तीची जाणीव करून दिली आहे. संजय राऊत यांना मी धन्यवाद देतो, त्यांनी मला माझ्या ताकतीच अनुभव करून दिला आहे. त्यामुळे या टिप्पणीला सकारात्मक घेतले पाहिजे, असे यावेळी नाना पटोले म्हणाले. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाविकास आघाडीच जिंकणार :पटोले पुढे म्हणाले की, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे जात आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही या दोन्ही पोटनिवडणूका जिंकणार आहे. गेल्या 9 वर्षात भाजपचे राज्यातील असो की केंद्रातील सरकार असो या सरकारने महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची आत्महत्या, व्यापाऱ्यांना संपवणे अशी धोरणे राज्यात राबविली आहे. तसेच देशाची संविधानिक पद्धत संपवण्याचा प्रयत्न देखील भाजपकडून करण्यात येत आहे. या सगळ्या गोष्टींचा राग जनतेच्या मनात आहे. नुकतेच शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातून जनतेने दाखवून दिले आहे आणि आत्ता ही जनता पाठिंबा देणार असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले. तसेच या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते स्टार प्रचारक म्हणून सभा घेणार आहे, असे देखील यावेळी नाना पटोले म्हणाले.
भाजपवर केली टीका : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येणार अशी चर्चा आहे. यावर पटोले म्हणाले की, देशाचे पंतप्रधान महिन्याभरात दोन वेळा मुंबईच्या प्रचारासाठी मुंबईत येत आहे. आणि आता कसब्याच्या बाबतीत अमित शाह येत आहेत, याचा अर्थ की राज्यात भारतीय जनता पक्षाची परिस्थिती काय आहे, हे यातून स्पष्ट होत आहे, असे त्यांनी सांगितले.
राहुल गांधींची तुलना करू नये : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. यावर नाना पटोले म्हणाले की, चांगली गोष्ट आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखी अक्कल राहुल गांधी नाही. आज राहुल गांधी देशातील सर्व धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत. तसेच संविधानिक व्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न देखील करत आहे. तर दुसरीकडे मोदीजी हे संविधानिक पद्धत बदलत आहे, देश विकत आहे. धर्मा धर्मात भांडण लावण्याचे काम करत आहे. राहुल गांधी राहुल गांधी आहे त्यांची तुलना भाजपचे नेत्यांशी करू नये, असा आमचा सल्ला आहे, असे यावेळी नाना पटोले म्हणाले.