पुणे (पिंपरी चिंचवड) : राज्यात कांद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. केंद्र सरकारने लावलेल्या 40 टक्के निर्यात शुल्काविरोधात राज्यात विरोधी पक्षांकडून आंदोलन सुरू आहे. आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या चाकण येथे पुणे-नाशिक महामार्गावर कांद्याची माळ गळ्यात घालून 'रास्ता रोको' केला.
भाजपाला सत्तेची मस्ती : सरकारने कांद्याचे निर्यातशुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप दिसत आहे. तसेच पत्रकार, वकील, शेतकरी, तरुण सुरक्षित नाही अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. अशा विदारक चित्राला बदलण्याचे काम काँग्रेस करेल. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम काँग्रेस करेल कारण भाजपाला सत्तेची मस्ती आली आहे. कांदे खाऊ नका, मासे खा असे म्हणत शेतकऱ्यांची थट्टा करायला हे निघाले आहेत. परंतु काँग्रेस हे अजिबात खपवून घेणार नाही आणि ही लढाई काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांबरोबर लढेल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याविरोधात राज्यात विरोधी पक्षांकडून आंदोलन सुरू आहे. पत्रकार, वकील, शेतकरी, तरुण सुरक्षित नाही अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. तर शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम काँग्रेस करेल. - नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
सरकार भरपाई देणार का : कांदा हे सडणारे पीक आहे. नाफेडने 10 दिवसांनी कांदा खरेदी केल्यास तो खराब होईल, म्हणून सरकार नुकसानभरपाई देणार का? सरकार शेतकरी विरोधी असल्याचे त्यांनी म्हटले. नाना पटोले पुढे म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचा दावा करत असेल तर 40 टक्के शुल्क काढून टाकावे. कांदा निर्यात केला तर शेतकऱ्यांना पैसे मिळतील. तसेच महाराष्ट्रातील सरकार हे ईडीचे नव्हे, तर येड्यांचे सरकार असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.