पुणे - मार्च महिन्यात देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर अचानक लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि व्यवसाय बंद होते. त्यामुळे नाशवंत पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. या व्यावसायिकांमध्ये मिठाई विक्रेत्यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
लॉकडाऊनच्या काळात मिठाई व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले अचानक लॉकडाऊन लागल्याने अनेक मिठाईवाल्यांचे नुकसान झाले. पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये काही मिठाईवाल्यांच्या अनेक शाखा आहेत. अशा मोठ्या मिठाई व्यावसायिकांना लॉकडाऊनमुळे लाखो रुपयांचा फटका बसला. बहुतांशी मिठाईही दुधापासून तयार केली जात असल्याने ती नाशवंत असते. ज्यावेळी लॉकडाऊन लागला तेव्हा दुकानांमध्ये तयार असलेली मिठाई दुकानदारांनी नागरिकांना अशीच वाटून दिली तर खराब झालेली मिठाई नाईलाजाने फेकून द्यावी लागली.
पुणे शहरात 1940मध्ये 'दिल्लीवाला डेअरी अँड स्वीट्स' च्या मालकाने छोट्या स्वरूपात आपला व्यवसाय सुरू केला होता. आता त्यांच्या पुणे शहरात आठ ठिकाणी शाखा आहेत. दिल्लीवाला यांची मिठाई आणि लस्सी प्रसिद्ध आहे. 23 मार्चनंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या आठही शाखांमधील मिठाई, मावा, लस्सी, दही, चक्का, श्रीखंड फेकून द्यावे लागले. त्यांना अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.
आता अनलॉकमध्ये जेव्हापासून दुकाने सुरू करण्यात आली आहेत तेव्हापासून श्रीखंड, तूप, दही यांच्या खरेदीसाठी ग्राहकांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. अगोदर दररोज 250 ते 300 किलो दही विक्री होत असे. सध्या फक्त 40 ते 50 किलोपर्यंतच दही विकले जाते, अशी माहिती मोहसीन मोहम्मद दिल्लीवाला यांनी दिली.
दिल्लीवाला यांच्या प्रमाणेच शेकडो शहरांमध्ये लाखो मिठाई व्यावसायिकांना लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. आता अनलॉकमध्ये दुकाने सुरू करण्यास परवानगी तर मिळाली आहे मात्र, पूर्वी प्रमाणे ग्राहक मिळत नसल्याने मिठाई व्यावयायिक संकटात आले आहेत.