पुणे - संगणक अभियंता असलेल्या महिलेने पती आणि सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. शनिवारी दुपारी चिंचवडमध्ये ही घटना घडली. मेघा संतोष पाटील (वय-३४) असे या महिलेचे नाव आहे. तिने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी डॉक्टर पती संतोष नामदेव पाटील याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
मेघा यांचा पती संतोष नामदेव पाटील हा पुण्यातील एका रुग्णालयात डॉक्टर आहे. मृत मेघा हिंजवडीमधील एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होत्या. सासरे नामदेव आणि पती संतोष हे त्यांच्या सोबत भांडण करत असत, नोकरीवरून आल्यानंतरही घरातील कामे करण्यावरून त्यांचे वाद होत. मागील अनेक दिवसांपासून मेघा यांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता.