पुणे- लॉकडाऊन काळात दिल्लीत अडकल्यानंतर जास्त पैसे खर्च झाले या कारणावरुन कामगार आणि कंपनी मालकामध्ये भांडण झाले. या भांडणानंतर कंपनी मालकासह तिघांनी कामगाराचे अपहरण करत त्याला अमानुष मारहाण केली. इतके करूनही आरोपी थांबले नाहीत तर त्यांनी कामगाराच्या गुप्तांगावर सॅनिटायझरचा स्प्रे मारला आणि पाय धुतलेले पाणी पिण्यास भाग पाडले. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. कोथरुड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 30 वर्षीय तरुणाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोथरूड परिसरातील एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामकाज पाहतात. लॉकडाऊन लागू होण्याच्या आधी कंपनीच्या कामानिमित्त ते दिल्ली येथे गेले होते. तेव्हा अचानक लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्यांना दिल्लीत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. लॉकडाऊन जसजसा वाढत गेला तसे त्यांच्या जवळचे पैसे संपत गेले. त्यानंतर त्यांनी फोनद्वारे मालकांकडे पैशाची मागणी केली, परंतु कंपनी मालकाने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव कंपनीचा लॅपटॉप हॉटेलमध्ये तारण ठेवावा लागला. लॉकडाऊन संपल्यानंतर पुण्यात आल्यानंतर ते एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाले. जवळ पैसे नसल्यामुळे त्यांना तिथेही कंपनीचा मोबाइल तारण ठेवावा लागला.