दौंड -पुणे शहरात सुरू असलेली पुणे महानगर पालिकेची पीएमपीएमएल बस सेवा आता दौंड तालुक्यातील यवत ते राहु पर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहे. यामुळे रोज कामानिमित्त येजा करणाऱ्या दौंड तालुक्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला असून समाधान व्यक्त केले जात आहे.
पुणे - सोलापूर महामार्गावरील स्वारगेट आगारातील किंवा इतर आगारातील एसटी परिवहन मंडळाच्या बस अनियमीत असतात. या सर्व बस यवत ते राहू मार्गावर थांबा असून ही न थांबता सुसाट वेगाने धावतात. यामुळे यवत ते खडकी पर्यंतच्या अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती. स्वारगेट प्रवाशी बसला तर त्याला वरवंड व पाटसला बस थांबा असताना ही घेतले जात नाही. उडाण पुलावरून बस महामार्गावरून सुसाट वेगाने प्रवाशांना न घेता धावते. यामुळे राज्य परिवाहन मंडळाच्या या एस.टी. बसेसच्या विरोधात तालुक्यात प्रवाशी, विद्यार्थी व कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलने केली होती.
चालक आणि वाहक यांचे गुलाब पुष्प देवून प्रवाशांनी केले स्वागत -
आता मात्र या एसटी बसेसला पर्याय झाला असून एसटी बसलेला मोठी चपराक बसली आहे. पुणे शहरात धावणारी पीएमपीमएलची बस आता शहरातून दौंड तालुक्यातील ग्रामिण भागा पर्यंत धावणार आहे. हडपसर ते यवत तसेच पुणे ते राहू, वाघोली ते राहू या तालुक्यातील गावांपर्यंत ही पुणे महानगर पालिकेची पीएमपीएमएल बस प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहे. या बसेसेच नुकतेच यवत व राहु येथे प्रवाशांची उदघाटन करून जंगी स्वागत केले. वाहन चालक आणि वाहक यांचे गुलाब पुष्प देवून प्रवाशांनी स्वागत केले.
सर्वसामान्य नागरीकांना दिलासा -
हडपसर ते यवत पर्यंत रोज दिवसाला सहा बस असून दिवसातून 24 फेऱ्या होणार आहेत. पुणे ते राहू आणि वाघोली ते राहू पर्यंत चार बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. या बसेस रोज सुरू राहणार असून 45 मिनिटाला धावणार आहेत. यामुळे तालुक्यातील पुण्याला कामा नियमीत प्रवास करणारे कामगार, विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरीक यांना ही बस सेवा सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी होणारी गैरसोयीमुळे आता वेळेत आणि जलद गतीने सुखकर असा प्रवास होणार आहे. यवत व राहु भागातील अनेक गावांना या बस सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. यामुळे या भागातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.