पुणे- बळीराजासह सर्व महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत असलेल्या पावसाची अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. 19 तारखेला मुंबईत चांगला पाऊस होईल आणि 21 तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याप्रमाणे अंदाज घेऊनच शेतकऱयांनी काळजीपुर्वक पेरणी करावी, असा सल्ला हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.
येत्या शुक्रवारपर्यंत मान्सून महाराष्ट्रात होणार दाखल -
महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे, सर्व राज्याचे लक्ष लागलेल्या मान्सूनचा प्रवास संथगतीने सध्या सुरू आहे. अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या वायू चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला होता. मान्सूनचा अरबी समुद्रावरील प्रवाह अद्यापही मंदच असल्याचे दिसून आले आहे. त्याचा परिणाम म्हणून पावसाने अपेक्षित चाल केली नसून महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.