पुणे - Santosh Chordia passed away : 'आम्ही एकपात्री' या संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रयोग करणारे एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांचे आज पहाटे हदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 4 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगा अजिंक्य, कन्या अपूर्वा असा परिवार आहे.
एकपात्री कलाकार प्रवीण चोरडिया यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून सातत्याने एड्स ग्रस्त आणि कृष्ठरोग्यांमध्ये आनंद पेरण्याचे काम केलं आहे. कलेला समाजसेवेची जोड देत त्यांची वाटचाल सुरू होती. माध्यम प्रतिनिधींपासून राजकीय ,सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात त्यांची एक वेगळीच ओळख होती. पुण्यात अनेक सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रमात चोरडिया यांनी सूत्रसंचालन देखील केलं आहे. मिश्किल स्वभाव, हजरजबाबीपणा, विनम्रता यामुळे ते कुटुंबीयांसह मित्र परिवारात खूप लोकप्रिय होते. सर्वांना मदत करण्याच्या स्वभावासाठीही ते खास ओळखले जात. त्यांच्या अशा अचानक एक्झीटमुळे पुण्याच्या कलाविश्वातील महत्त्वाचा तारा निखळल्याची भावना कलाप्रेमींमध्ये आहे.
रंगभूमीत चोरडिया हे गेली ३८ वर्षे कार्यरत होते. 'दुसरी गोष्ट' , 'कँपँचिनो ', ' दगडाबाईची चाळ ' , 'प्रेमा ', 'सरगम' अशा अनेक मराठी गाजलेल्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. 'जीना इसी का नाम है' आणि 'फुल २ धमाल' या कार्यक्रमांची निर्मिती आणि सादरीकरण देखील त्यांनी केलं आहे. भारतासह परदेशात त्यांनी आपल्या प्रतिभेनं कलाकर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे.
गेली 38 वर्षे ते थिएटर, टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधून रसिकांचे मनोरंजन क्षेत्रात काम करत असताना त्यांचे सामाजिक काम देखील मोठे होते.चोरडिया यांनी अनेक कॅन्सरग्रस्तांसाठी, मूकबधीर, अनाथ, एचआयव्ही लोकांसाठी सतत्यानं कार्य केलं आहे. भारतातच नव्हे तर विदेशात देखील त्यांचे प्रयोग केले आहेत.