पुणे :दिल्ली छावणी परिसरातील मानेकशॉ सभागृहात भारत निवडणूक आयोगाच्या वतीने १३ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री प्रा. एस. पी. बघेल, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे उपस्थित होते. यावेळी देशातील विविध भागांमध्ये निवडणूक मतदान प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यांना, जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यामधील ८० लाख मतदारांना शुभेच्छा : भारत निवडणूक आयोगाचा या वर्षाची संकल्पना 'मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही', अशी आहे. यावेळी प्रख्यात निर्देशक सुभाष घई द्वारा निर्मित 'मैं भारत हॅुं' या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राशी संवाद साधताना ते म्हणाले, आजचा महत्वाचा दिवस आहे. तेरावा राष्ट्रीय मतदार दिवस आज आपण या ठिकाणी साजरा केला आणि सर्व देशामध्ये दहा लाख पेक्षा जास्त ठिकाणी आज आपण साजरा करत आहोत, मी आजच्या मतदार दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रामधील आणि विशेष करून पुणे जिल्ह्यामधील ८० लाख मतदारांना शुभेच्छा देतो, त्यांचा अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाचे आम्ही आभार मानतो. पुणे जिल्ह्यामधील आमच्या सर्व टीमने गेल्या दोन वर्षांमध्ये मतदार यादी आणि निवडणुकांच्या संदर्भात घेतलेल्या परिश्रमाची फलश्रुती आज मिळाली आणि आज आमच्या सगळ्या टीमला माझ्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे असही ते म्हणाले आहेत.
४८ हजारावर युवकांची मतदार नोंदणी : गेल्या दोन वर्षांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी परिश्रम घेतले आहे. यामध्ये जवळपास सात लाखापेक्षा जास्त जे निवासी मतदार आहेत त्यावर काम केले. त्याचप्रमाणे मतदार यादी सर्वसमावेशक करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष करून महिला मतदार, तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. विशेष शिबिरांचेही आयोजन करण्यात आले. १७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदारांची नोंदणी करण्यासाठी (दि. २५ नोव्हेंबर)रोजी आणि (दि. ५ डिसेंबर)रोजी या दोन दिवशी ४४२ महाविद्यालयात महाशिबिरांचे आयोजन करून मतदार नोंदणी करण्यात आली. यातून ४८ हजारावर युवकांची मतदार नोंदणी करण्यात आली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.