पुणे - एक खेळाडू म्हणून खेळताना कायम वैयक्तिक कामगिरीवर लक्ष ठेवावे लागत होते. मात्र, आता संपूर्ण संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवावे लागणार असल्याने ही एक कठीण जबाबदारी आहे, असे पुणेरी पलटण टीमचे नवनियुक्त प्रशिक्षक अनुप कुमार यांनी सांगितले आहे.
खेळाडूपेक्षा प्रशिक्षक म्हणून जबाबदारी मोठी - अनुप कुमार प्रो कबड्डी लीगच्या सातव्या पर्वासाठी पुणेरी पलटण टीम सज्ज झाली आहे. पुणेरी पलटनच्या नवीन कर्णधाराची आणि प्रशिक्षकाची बुधवारी पुण्यात घोषणा करण्यात आली. या सीझनसाठी पुणेरी पलटणच्या नवीन प्रशिक्षकपदी म्हणून नुकताच निवृत्त झालेला भारताचा आघाडीचा कबड्डीपटू अनुप कुमार याची निवड करण्यात आली आहे. तसेच संघाचे नेतृत्व भारताचा आघाडीचा डिफेंडर सुरजित सिंग याच्याकडे सोपवण्यात आले आहे.
यंदाच्या सीझनमध्ये पुणेरी पलटण निश्चितच किताब जिंकेल, असा विश्वास अनुप कुमारने यावेळी व्यक्त केला. तर नवनिर्वाचित कर्णधाराने व्यवस्थापनाने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे सांगत संघाला आघाडी घेण्याची संधी मिळाली आहे त्याचे सोने करू, असा निर्धारही व्यक्त केला.
यावेळी पुणेरी पलटणच्या संघात अनुभवी तसेच तरुण खेळाडूंचा समावेश करत समतोल साधण्यात आला आहे. करार सुरजित सिंग यांच्यासोबत नितीन तोमर, गिरीश मंजित, पवन कुमार दर्शन यासारखे तरुण आणि प्रतिभावंत खेळाडू संघात आहेत.
विवो प्रो-कबड्डी लीगच्या सातव्या पर्वाला 20 जुलैपासून सुरू होणार आहे. यामध्ये पुणेरी पलटणचा पहिला सामना 22 जुलैला हैदराबादमध्ये हरियाणा स्टीलर्स विरुद्ध खेळला जाणार आहे. तर पुण्यात पुणेरी पलटणचा सामना 14 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या काळात होणार आहेत.