पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंना इको कारमधून प्रदर्शन दाखवण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे बसलेल्या गाडीचे स्टेरिंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात होते. यावर उद्धव ठाकरेंनी आमच्या गाडीचे चाक यांच्या (अजित पवार) हातात अशा प्रकारची मिश्कील टिपण्णी केली. तर बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अजित पवार हे आमच्या सरकारची स्टेपनी असल्याचे म्हटले होते.
'अजित पवार स्टेपनीवरून स्टेअरिंगवर' - मुख्यमंत्र्यांची अजित पवारांवर मिश्कील टिपण्णी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी उद्धव ठाकरे बसलेल्या गाडीचे स्टेरिंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात होते. यावर उद्धव ठाकरे यांनी आमच्या गाडीचे चाक यांच्या (अजित पवार) हातात अशा प्रकारची मिश्कील टिपण्णी केली.
या कृषी प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेता आमिर खान, आमदार विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार यांची उपस्थिती होती. बारामतीमधील परंपरेनुसार कृषी विज्ञान केंद्राला भेट देणाऱ्या पाहुण्यांना इको कारमधून केंद्राचा फेरफटका मारण्याचा पवार कुटुंबीयांचा प्रघात आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कृषी केंद्रात दाखल झाल्यानंतर त्यांनी देखील इको कारमधून फेरफटका मारला.
सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एका कारमध्ये होते. तर दुसऱ्या इको कारमध्ये अजित पवार इतर मंत्र्यांना घेऊन फेरफटका मारत होते. ही कार स्वतः अजित पवार चालवत होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अजित पवार चालवत असलेल्या इको कारमध्ये बसत आमचे स्टेरिंग यांच्या हातात अशी मिश्किल टिप्पणी केली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर ही टिपण्णी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.