पुणे: राज्यात सत्तासंघर्षनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहेत. आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमचे जुने नेते त्यांनी काल पुण्यात ऑनलाईन सभा घेतली. आम्हाला वाटले होते सत्ता गेल्यानंतर ते लाईनवर येतील. त्यांना कोणी सांगितले की तुम्ही ऑनलाईन सभा घ्या. कारण हेमंत रासने हेच ही निवडणूक जिंकणार आहेत, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र: कसबा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोड शो समाप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री यांनी जाहीर सभा घेत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांसह विरोधकांवर जोरदार टीका केली.
अजित पवारांवर टीका: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांनी केलेल्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जेव्हा शेतकरी पाणी मागतो तेव्हा हे काय दाखवतात. हे आपण पाहिले आहे. जाऊ द्या मी बोलत नाही अशा लोकांकडून काय आपण अपेक्षा करणार आहे. अजित पवार म्हणतात, मुख्यमंत्री यांनी सभा घ्यायची? पण एकनाथ शिंदे हा सामान्य माणसाचा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मी आज रोड शो केला आहे.
मागील 60 वर्षांचा हिशेब द्या: मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज मी एमपीएससीचे विद्यार्थ्यांना सांगतो आम्हाला श्रेय घ्यायचे नाही. आमची भूमिका ही विद्यार्थ्यांची भूमिका आहे. मी जे बोलतो ते करून घेतो, आम्ही चुकीचे कुठे जात नाही आम्ही नदीवर जाऊन तसेच कुठेही जाऊन प्रायश्चित करायला गेलो नाही. आज विरोधी पक्षातील नेते आम्ही सात महिन्यात काय केले असे विचारत आहेत. पण तुमचे पुण्यात ६० वर्ष सत्ता होती. काय केले याचे हिशोब द्या, असे देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.