पुणे - पुढच्या पाच वर्षात दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे उदिष्ट असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच होर्डिंग लावून कोणाला तिकिट मिळणार नाही. काम पाहून तिकिट देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पाच वर्षात आम्ही केलेल्या कामाबद्दल जनता समाधानी असून, आम्हाला प्रचंड समर्थन आहे. लवकरच युतीचीही घोषणा करणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
भाजपच्या महाजनादेश यात्रेचे शनिवारी पुण्यात आगमन झाले. त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सरकारने पाच वर्षाते केलेल्या कामांचा पाढा वाचला. त्यानंतर पुण्यात भाजप नेत्यांनी लावलेल्या एका होर्डिंगमुळे रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण झाला होता. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी होर्डिंग लावणाऱ्यांचे कान टोचले आहेत.
गेल्या ५ वर्षात महाराष्ट्र सगळ्या बाबतीत अग्रेसर आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धरणांची कामे झाली आहेत. बंद पडलेले सर्व प्रकल्प मार्गी लावले आहेत. जुन्या सरकारमध्ये पश्चिम महाराष्ट्रातले अनेक मंत्री होते, तरी कामे झाली नाहीत. मात्र, आमच्या सरकारने सर्व प्रकल्पांची कामे पूर्ण केली, अद्यापही कामे चालू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आता मेगा भरती नाही पण भरती आहे
आणखी भाजपमध्ये मेगा भरती होणार आहे का? असा प्रश्न केला असता मुख्यमंत्री म्हणाले, की आता मेगा भरती नाही मात्र, भरती जरुर आहे. यावरुन आणखी भाजपमद्ये काही नेते प्रवेश करणार असल्याचे समजते.