पुणे- शरद पवार यांची अवस्था ही 'शोले' चित्रपटातील 'जेलर' सारखी झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, असे ऐकले होते. मात्र, राष्ट्रवादीला दोन उमेदवार सापडत नाही आहे. अजित पवार यांच्या घड्याळाचे बारा वाजले आहे. त्यामुळे कोणीही त्यांची घड्याळ हातात घ्यायला तयार नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते.
पुढे ते म्हणाले, मी एका पत्रकाराला विचारले राष्ट्रवादीला उमेदवार सापडला नाही यामागे काय कारण आहे? तेव्हा पत्रकार म्हणाला, मी देखील अजित पवार यांना विचारले की, पिंपरी-चिंचवड शहर तुमचे आवडते आहे. येथील तुम्ही नेते होतात. मात्र, आता याठिकाणी उमेदवार सापडत नाही. त्यावेळी अजित पवार म्हणाले, काय करायचे पिंपरी-चिंचवडमध्ये आमच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत. त्यामुळे आमचे घड्याळ घ्यायलाच तयार नाहीत. त्यामुळे आमच्यासोबत कोणी राहायलाच तयार नाही, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर केली.