लोणावळा (पुणे) - गाव असो की शहरे ती स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी मुकादमांची असते. मात्र, त्याच मुकादमांकडे समाज आणि प्रशासनाचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांना दिले जाणारे स्थान हे सर्वश्रुत आहे. देशात पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात मात्र या मुकादमांना थेट फ्लेक्सवर स्थान देण्यात आले आहे. त्याचे सकारात्मक परिणामाचा अनुभवही शहरवासी घेत आहेत.
संकल्पनेमुळं मुकादमांना समाजात आदर -
थंड हवेचे ठिकाण म्हणून देशभरात ओळख असलेले लोणावळा शहर मोकळा श्वास घेत आहे. चकाचक रस्ते, परिसर कचरा आणि दुर्गंधीमुक्त झाल्याने शहराचा कायापालट झाला. शहरात ठिकठिकाणी झळकणारे फ्लेक्स हे त्याचे कारण आहे. प्रत्येक फ्लेक्सवर त्या परिसरातील मुकादमांचा फोटो, नाव, मोबाईल नंबर आणि त्यांनी करावयाच्या कामाचा तपशील नमूद आहे. या संकल्पनेमुळे मुकादमांना समाजात आदर मिळत आहे. त्यामुळेच मुकादमही चोख काम बजावत आहेत.
पूर्वीपेक्षा लोणावळा शहर अधिक सुंदर -
मुकादम निलेश सोनवणे म्हणाले की, गवळी वाडा प्रभागातील मी मुकादम असून माझी सर्व माहिती आणि कामांचा तपशील फ्लेक्सवर टाकण्यात आलेला आहे. यामुळे नागरिकांना येथील मुकादमांची माहिती आहे. त्यांना मदत लागल्यास ते ताबडतोब आमच्याशी संपर्क साधतात. मग आम्ही त्यांची समस्या सोडवतो. आम्ही दिवसातून दोन वेळा परिसर स्वच्छ करतो. नागरिकांचेही त्यावर लक्ष असते. त्यामुळे त्यांनाही फोन करायची वेळ येत नाही. या संकल्पनेमुळे पूर्वीपेक्षा शहर खूप स्वच्छ आणि सुंदर होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.