महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकरावी प्रवेश प्रक्रिया थांबल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल - अकरावी प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षण परिणाम

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात विद्यार्थी पहिल्या सत्राच्या परीक्षांच्या तयारीला लागतात. मात्र, यावर्षी ऑक्टोबर संपत आला तरी अद्याप प्रवेशच झालेले नाहीत. कोरोनाच्या संकटामुळे लांबलेली प्रवेश प्रक्रिया आता नवीन संकटामुळे अडकून पडली आहे.

students
विद्यार्थी

By

Published : Oct 29, 2020, 12:43 PM IST

पुणे -मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याने विविध भरती प्रक्रिया, प्रवेश प्रकियांवर परिणाम झाला आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सध्या थांबलेली आहे. शिक्षण प्रक्रियाच थांबल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त करताना विद्यार्थी व पालक

फक्त २५ टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित -

पुणे शहरात अकरावी प्रवेशासाठी 2 लाख 20 हजार मुलांनी अर्ज केले आहेत. यातील 53 हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित केले. मात्र, त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली. त्यामुळे अर्ज केलेल्या 75 टक्के विद्यार्थ्यांचे अद्याप प्रवेश झाले नाही. तर, ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत, त्यांचे वर्गच सुरू झाले नाहीत.

कोरोना पाठोपाठ मराठा आरक्षणाची आडकाठी -

यावर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यापासूनच परीक्षा अडचणी आल्या. त्यानंतर मार्ग काढत निकाल लावले गेले. त्यानंतर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यात पुन्हा अडचण निर्माण झाली. त्यामुळे मुलांचे वर्ष वाया जाण्याची भीती पालकांना आहे. कोरोनाच्या संकटातून शिक्षण विभागाने मार्ग काढला मात्र, आता मराठा आरक्षणाच्या रुपाने नवीन संकट उभे राहिले आहे. सरकारने प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालावे आणि प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

राज्यभरातील विद्यार्थी चिंतेत -

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. शाळा-महाविद्यालये सुरू होण्याची अद्यापही काही शक्यता नाही. यामुळे राज्यभरातील विद्यार्थी चिंतेत आहेत. लवकरात लवकर शासनाने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी आशा विद्यार्थ्यांना आहे. याबाबत विद्यार्थी संघटना, पालकांनी शिक्षण मंत्र्यांना निवेदनेही दिली आहेत. आता यावर काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details