पुणे - दौंड तालुक्यातील केडगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटातील लोक मोठ्या संख्येने एकत्रित जमा झाल्याने, केडगामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे काम हाती घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (रविवार) केडगाव येथे गाडी आडवी लावण्याच्या कारणावरून किरकोळ भांडण झाले होते. या भांडणामुळे एका गटाने मोर्चा काढला होता. मोर्चा काढलेल्या लोकांनी दुसऱ्या गटाच्या काही लोकांना मारहाण केली. यामुळे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुन्हा दोन गटात बाचाबाची झाली.
किरकोळ कारणावरुन केडगावात दोन गटात बाचाबाची यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि बारामतीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन्ही गटातील काही लोकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दौंड परिसरातील अतिरिक्त पोलीस बळ केडगाव येथे मागवण्यात आले आहे. तसेच खबरदारीच्या दृष्टीने केडगावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नेमके काय आहे प्रकरण वाचा -
काल दुपारच्या सुमारास केडगाव येथील बाजारपेठेत आडवी असलेली दुचाकी बाजूला घे म्हणल्याच्या कारणावरून काही युवकांनी व्यापारी सुनील निंबाळकर यांना शिवीगाळ केली होती. यावेळी उपस्थित लोकांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले होते.
परंतु काही वेळानंतर मार्केट यार्डात आनंदघना प्लॅटसमोर उभा असताना सुनील विश्वनाथ निंबाळकर यांना काही तरुणांनी मारहाण केली. या मारहाणीदरम्यान, त्यांचे ४ तोळे वजनाची सोन्याची चेन गहाळ झाली असल्याची फिर्याद सुनील निंबाळकर यांनी दिली होती. या तक्रारीवरुन आज पुन्हा दोन गटामध्ये बाचाबाची झाली.