बारामती - बारामती तालुक्याच्या पूर्व पट्यातील डोर्लेवाडी परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून कऱ्हा व नीरा नदीला महापूर आला आहे. सोनगाव येथील सोलनकर वस्तीवरील पुराच्या पाण्यात अडकलेल्या 25 नागरिकांना 'रेस्क्यू टीम'ने अथक प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले.
काल (ता.14) रोजी दिवसभर मुसळधार पाऊस पडत असल्याने रात्रीपासून निरा व कऱ्हा नदीत धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच सर्वदूर पाऊस असल्याने गावातील पाणी मोठ्या प्रमाणात नदीत गेल्याने दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सोनगाव येथे दोन्ही नद्यांचा संगम होत असल्याने याठिकाणच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले असून गावातील 50 हून अधिक घरे रात्रीपासून पाण्यात आहेत.
तसेच सोनगाव- मेखळी रोडवर असलेल्या सोलनकर वस्तीला पुराच्या पाण्याने वेढा दिल्यामुळे येथील 25 नागरिक पाण्यात अडकले होते. सकाळी याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी प्रशासनास दिली. मात्र काल रात्रीपासून मोबाईल सेवा खंडित असल्यामुळे पाण्यात अडकलेल्या नागरिकांशी संपर्क होत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाच्या वतीने एनडीआरएफ व मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीमला संपर्क करण्यात आला. दुपारी 3 वाजता मुळशी आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम आल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने पुरात अडकलेल्या नागरिकांना काढण्यास सुरुवात केली. 2 तासांच्या अथक प्रयत्नाने महिला, पुरुष व लहान मुले असे सुमारे 25 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. यामध्ये 2 महिन्यांच्या बाळाचा देखील समावेश होता.
25 नागरिक पाण्यात अडकले होते पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, नगरसेवक सचिन सातव यांनी सोनगाव येथे भेट देऊन पूर परिस्थितीची माहिती घेतली.
पुरात अडकलेले 25 नागरिक सुखरुप बाहेर पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, माजी सरपंच विकास माने, तलाठी, ग्रामसेवक, बारामती सायकल क्लब तसेच गावातील युवकांनी यावेळी प्रशासनास मोलाचे सहकार्य केले.