बारामती (पुणे)- एका बाजूला बारामतीचा सर्वांगीण विकास तर दुसर्या बाजूला नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातच नागरिकांना प्राथमिक सोयी-सुविधा नसल्याचा विरोधाभास शहरात पहावयास मिळत आहे. 2013 मध्ये बारामती नगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आली. या हद्दवाढीत तांदळवाडी, रुई, जळोचीसह काही ग्रामीण भागाचा समावेश करण्यात आला. मात्र, या वाढीव हद्दीत अनेक ठिकाणे पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत.
हद्दवाढीवेळी शेंडेवस्ती, समर्थनगर हा भाग नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात जोडण्यात आला आहे. मात्र, याठिकाणी प्राथमिक सोयी सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. शेंडेवस्तीतील नागरिक अक्षरशः विविध समस्यांनी त्रस्त झाले आहे. या भागात रस्ता, पाणी, स्वच्छतेचा अभाव आहे. येथील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरुन पायी चालणेही जिकरीचे झाले आहे. अगोदरच कच्चा रस्ता त्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांसह लहान मुलांना इजा झाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. तसेच पावसाळ्यात नेहमीच वस्तीच्या चारही बाजूने ठीकठिकाणी पाणी साचून राहते. सर्वत्र गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याचे पाणीसुद्धा विकत आणून प्यावे लागत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्यांबाबत आम्ही वेळोवेळी पालिका प्रशासनाला कळवले असताही दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील नागरिक म्हणतात.
शेजारीच असणार्या समर्थ नगर भागातही नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी या भागात आठवड्यातून दोन वेळेस टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच रात्रीच्या वेळी येथील नागरिकांना मोकाट कुत्री व डुकरामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील अंतर्गत रस्त्यावर चेंबर नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहेत. येथील काही चेंबर रस्त्यापासून फूटभर वर तर काही चेंबर रस्त्यापासून खोल आहेत. त्यामुळे वाहन चालवताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या चुकीच्या पद्धतीने बनवलेल्या चेंबरमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सॅल्यूट मारून माजी सैनिकाची पालिकेला विनंती