पुणे- चिंचवड परिसरात जबरदस्तीने मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ मोबाईल, एक टॅब आणि दुचाकी असा ऐकून ८५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
मोबाईल हिसकावून पोबारा करणारे गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात; चिंचवड पोलिसांची कारवाई - shahabaz shaikh
चिंचवड परिसरात जबरदस्तीने मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
केतन मिलिंद गायकवाड (वय- २४ वर्षे, रा.चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यासोबत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल फोन हिसकावून चोरून नेणाऱ्या चोरट्यांबाबत चिंचवड पोलीस तपास करीत होते. दरम्यान, चिंचवड पोलीस ठाण्यात एक मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्यातील मोबाईल शोधत असताना तपास पथकाला मोबाईल फोन हिसकावणाऱ्या केतन गायकवाड बाबत माहिती मिळाली. पोलिसांनी केतन गायकवाड आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. तिघांकडून ४ मोबाइल फोन आणि एक टॅब तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ८५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, गुन्हे पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव यांच्या पथकाने केली आहे.