पिंपरी-चिंचवड (पुणे) -शहरातील भोसरी येथे तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (सोमवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास सद्गुरु नगर, जुना कचरा डेपो, भोसरी याठिकाणी घडली आहे. इतर तीन मुलांना तेरा वर्षीय आयुष्य गणेश तापकीर या चिमुकल्याने वाचविले आहे. सूरज अजय वर्मा (12) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोहण्यासाठी गेली होती तलावावर -
संदीप भावना डवरी (12), ओमकार प्रकाश शेवाळे (13), ऋतुराज प्रकाश शेवाळे (14) अशी पोहण्यासाठी आणि तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत. या सर्वांना जनावरे चारण्यासाठी आलेल्या आयुष्य गणेश तापकीरने वाचविले आहे.
तिघांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्गुरू नगर जुना कचरा डेपो येथे तलाव आहे. त्याठिकाणी आज (सोमवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास मयत सूरजसह संदीप, ओमप्रकाश आणि ऋतुराज हे सर्व जण पोहायला गेले होते. तलावाच्या आत काही अंतरावर खडक आहे. त्यांच्यापुढे पाणी जास्त खोली होते. दरम्यान हे पोहत असताना तिथपर्यंत पोहोचले. त्यांच्यापुढे जाताच सर्व जण बुडायला लागले. तेव्हाच, देवदूतासारखा जनरावरे चारणारा आयुष्य हे पाहिले आणि त्या चार मित्रांपैकी संदीप, ओमप्रकाश आणि ऋतुराजला वाचवण्यात त्याला यश आले. मात्र, सुरुज हा पाण्यात दिसेनासा झाला. त्यामुळे भोसरी पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. काही तासांनी त्याचा मृतदेह शोधण्यात अग्निशमन विभागाला यश आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली आहे.
हेही वाचा -अनैतिक संबंधाच्या संशयातून भाजी विक्रेत्याची तलवारीचे वारकरून हत्या, चौघांना अटक