पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती निमित्ताने महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर राज्यशासनाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम किल्ले शिवनेरीवर पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे शिवरायांच्या जन्मस्थळी जाऊन नतमस्तक होतील.
मुख्यमंत्री ठाकरेंसह उपमुख्यमंत्री पवारही राहणार उपस्थित-
शिवजयंतीच्या या शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळी साडेआठ वाजता मुंबईतून हेलिकॉप्टरने किल्ले शिवनेरीकडे रवाना झाले. सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी मुख्यमंत्री किल्ले शिवनेरीवर पोहोचतील, त्यानंतर किल्ले शिवनेरीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री पुष्पहार अर्पण करतील. यावेळी शिवनेरीवर आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवनेरी गडावर होणारे या कार्यक्रमासाठी मर्यादित लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. गडावर शिवप्रेमींना येण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळीच गडावर संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.