पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आपल्या वेळेला नेहेमीच किंमत देत असल्याचे अनेक कार्यक्रमातून पाहायला मिळते. कोणत्याही कार्यक्रमाला वेळेवर पोहोचण्यासाठी राज्यात एखादा नेता असेल तर ते म्हणजे शरद पवार. वेळेच्या आधीच कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे चित्र अनेक कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळते. आजही याची प्रचीती आली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाली. या सभेला पवार वेळेवर हजर होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळेवर न पोहोचल्याने त्यांना अर्धा तास त्यांची वाट पहावी लागली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्धा तास उशिरा पोहोचल्यावर कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला उशीर -वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण समारंभ हा 11 वाजता सुरू होणार होता.पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर यायला उशीर झाल्याने ते कार्यक्रमस्थळी उशिरा आले. तोपर्यंत मुख्य व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट पाहत होते.