पिंपरी-चिंचवड (पुणे) -भोसरीत अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीला मूल होत नाही म्हणून चक्क पत्नीवर जादूटोणा करून तिला कोंबडीचे रक्त पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती हा लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याने मूल होत नाही म्हणून सासऱ्याने मीच मूल देतो असे म्हणून महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची प्रतिक्रिया तिघांवर गुन्हा दाखल -
या प्रकरणी अमित सुदाम वाघुले (33), सुदाम वाघुले (62), संध्या सुदाम वाघुले (53) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पती आणि सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पती आणि पत्नी दोघे ही उच्चशिक्षित आहेत.
पतीसह सासऱ्याला अटक -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीमध्ये विवाहित महिलेने सासरच्या मंडळीविरोधात तक्रार दिली आहे. यात कुटुंबीयांनी मूल होत नसल्याने बुवाबाजी करत जादूटोना करून कोंबडीचे रक्त पाजले असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तसेच पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नाही असे देखील तिचे म्हणणे आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपी सासऱ्यांनी मुलाची तपासणी करण्यासाठी पैसे घालविण्यापेक्षा मीच मूल देतो असे म्हणून सुनेचा विनयभंग केला. वारंवार मारहाण आणि पैश्यांच्या मागणीला कंटाळून विवाहितेने भोसरी पोलिसात तक्रार दिली आहे. घटने प्रकरणी पती आणि सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा -दिराच्या मदतीने वहिनीवर मित्राचा बलात्कार; प्रतिकार केल्याने दिराने केला वहिनीचा खून