पुणे : येत्या 6 जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. यंदा 350 व्या शिवराज्यभिषेक सोहळा असणार आहे. यामुळे यंदा मोठ्या दिमाखदार आणि उत्साहात शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे 5 आणि 6 जून 2023 रोजी हा सोहळा साजरा केला जाणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक संभाजी महाराज छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगडावर हा सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा कशाप्रकारे पाडणार, कोण-कोणते कार्यक्रम यावेळी होणार याविषयीची माहिती संभाजी राजे छत्रपती यांनी दिली आहे.
काय असणार वैशिष्ट्ये :किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1676 ला 'राज्याभिषेक' झाला होता. या ऐतिहासिक क्षणाची सदैव स्मृती राहावी, या हेतूने प्रतिवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर भव्य स्वरुपात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा या ऐतिहासिक घटनेचे 350 वे वर्ष सुरू होत आहे. यंदा 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा पार पडणार आहे. यामुळे यंदाचा सोहळा धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यावेळी अनेक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. सोहळ्याचे मुख्य आकर्षण धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची', 'जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा' व 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा' हे कार्यक्रम असणार आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक छत्रपती संभाजी महाराज आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. देशभरातील शिवप्रेमींनी, शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
5 जून रोजी असा असेल कार्यक्रम : यंदा गडावर 5 जून रोजी सायंकाळी 5 वाजता 'धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची' हा शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार. महाराष्ट्रातील युद्धकला आखाड्यांचा यात सहभाग असणार आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक युद्धकला कशी असते. याचे दर्शन गडावर येणाऱ्या तमाम देशवासियांना व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे. पट्टा, तलवार, भाला, वीटा, जंबिया, कट्यार, माडू, फरी गलका यांच्या विविध प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता राज दरबार येथे 'जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा' हा शाहिरी सादर केली जाणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शाहीर सहभाग घेणार आहेत.