पुणे Chhagan Bhujbal on Manoj Jarange : मराठा आरक्षणाचे नेता मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतंय. मनोज जरांगेंनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. यावर मंत्री भुजबळांनी ओबीसीसाठी काम करण्याचं मला वेड लागलंय. हे वेड शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाही, असं प्रत्युत्तर भुजबळ यांनी दिलंय. पुण्यातील सर्किट हाऊस इथं अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील विविध विषयांवर आपलं मत व्यक्त केलंय.
आगामी दौऱ्यांबाबत काय म्हणाले भुजबळ : यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस आहे. 3 जानेवारीला कुठंही असलो तरी आम्ही नायगांव इथं जात असतो. आज राज्याचे मुख्यमंत्री हेदेखील तिथं येणार आहेत. येत्या 6 तारखेला पंढरपूरात ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. तसंच 7 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबई इथं एक मेळावा आहे. त्या मेळाव्याला मी जाणार आहे. त्यामुळं मी नांदेड इथं होणाऱ्या एल्गार मेळाव्याला जाणार नाही. तसंच त्यानंतर 13 तारखेला बीडला जाणार आहे. बीडला जाणं आवश्यक असल्यानं तिथं सभा घेणार असल्याचं भुजबळांनी सांगितलंय.
बिहारसारखी सरसकट जातगणना करा : मागासवर्गीय आयोगाच्या वतीने करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणावर ते म्हणाले, जर तुम्ही दोन दिवसांत मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण करणार असाल, तर आमचंही सर्वेक्षण करा. पंधरा दिवसांत 50 टक्के असलेल्या मराठा समाजाचं आरक्षण होते. तर 100 टक्यांचं सर्वेक्षण करायला एक महिना लागेल. दोन महिने घ्या आणि सरसकट बिहारसारखी जातीय जनगणना करून टाका, अशी मागणी मंत्री भुजबळ यांनी केली.