पिंपरी-चिंचवडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग; जीवितहानी नाही - भोसरी एमआयडीसी आग प्रकरण
भोसरी एमआयडीसी येथील गवळी माथा परिसरात असणाऱ्या एका केमिकल कंपनीला सकाळी बाराच्या सुमारास भीषण आग लागली.
पिंपरी-चिंचवड (पुणे)- शहरातील भोसरी एमआयडीसी येथे एका केमिकल कंपनीला आज अचानक भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही.
भोसरी एमआयडीसी येथील गवळी माथा परिसरात असणाऱ्या एका केमिकल कंपनीला दुपारी बाराच्या सुमारास भीषण आग लागली होती. धुरांचे लोट काही किलोमीटर अंतरावरून दिसत होते. आगीच्या ज्वाला जवानांना जवळ येऊ देत नव्हत्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आणि खासगी 15 अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन जवानांना यश आले आहे. दरम्यान, अद्याप ही आग धुमसत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, केमिकल कंपनी असल्याने आग झपाट्याने पसरली होती. घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. अग्निशन अधिकारी नामदेव शिंगाडे, प्रताप चव्हाण, फायरमन संजय महाडिक, विष्णू बुधवनकर, अमोल चिपळूणकर, लक्ष्मण ओव्हाळ, सरोज उंडे, चेतन माने, अनिल डाबळे यांनी घटनास्थळी वेळेवर पोहचून आगीवर नियंत्रण आणले.