महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विश्वविक्रमी मिसळ! सात तासात तयार केली सात हजार किलो मिसळ - शेफ विष्णू मनोहर मिसळ विश्वविक्रम न्यूज

आतापर्यंत देश-विदेशात विविध विश्वविक्रम करण्यात आले आहेत. पुण्यात मात्र, एक आगळा-वेगळा विक्रम करण्यात आला. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सात हजार किलो मिसळ तयार केली आहे.

Misal
मिसळ

By

Published : Mar 14, 2021, 10:48 AM IST

पुणे - सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या संयुक्त विद्यमाने 'सूर्यदत्ता विष्णू महामिसळ वर्ल्ड रेकॉर्ड 2021 फेस्टिवल'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सात तासात सात हजार किलो मिसळ शिजवण्याचा व तीन तासात तीनशे एनजीओच्यांमार्फत तीस हजार गरजू लोकांपर्यंत ती पोहोचवण्याचा विश्वविक्रम झाला. 'सूर्यदत्ता फूड बँक' आणि 'सूर्यदत्ता एज्यु सोशिओ कनेक्ट' अंतर्गत हा उपक्रम झाला.

पुण्यात शेफ विष्णू मनोहर यांनी सात तासात सात हजार किलो मिसळ तयार केली
पुणेरी मिसळ ही पुण्याचे वैशिष्ट्य -

पुणे शहरात पुणेरी मिसळ ही पुण्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे महामिसळ तयार करून विश्वविक्रम करण्यात आला आहे. या महामिसळच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत केली जाणार आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात मिसळ प्रेमी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळेच मिसळ हा पदार्थ तयार करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती सूर्यदत्ता संस्थेच अध्यक्ष प्रा. संजय चोरडिया यांनी दिली.

अशी तयार झाली महामिसळ -

पहाटे 3 वाजल्यापासून महामिसळ तयार करण्यास सुरुवात झाली. यात 1 हजार 500 किलो मटकी, 500 किलो कांदा, 125 किलो आले, 125 किलो लसून, 350 किलो तेल, 180 किलो कांदा-लसूण मसाला, 50 किलो लाल तिखट मिरची पावडर, 50 किलो हळद, 25 किलो मीठ, 115 किलो खोबरे, 15 किलो तेज पान, 1 हजार 200 किलो मिक्स फरसाण, 4 हजार 500 लिटर पाणी, 50 किलो कोथंबीर वापरण्यात आली.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव म्हणून महामिसळ उपक्रम -

संस्थेच्या हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञानाचा अनुभव मिळावा. तसेच सामाजिक भावनेतून गरीब व गरजू लोकांना अन्नदान करता यावे या उद्देशाने महामिसळ तयार करण्याचा उपक्रम संस्थेत राबवण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्यात लोकांच्या उपस्थितीत महामिसळ झाली, अशी माहिती प्रा. संजय चोरडिया यांनी दिली.

शेफ विष्णू मनोहर यांचा 10 वा विश्व विक्रम -

शेफ विष्णू मनोहर यांनी देशभरात विविध विक्रम केले आहेत. सर्वात मोठा पराठा, 5 हजार किलो खिचडी, कबाब अशा विक्रमानंतर शेफ विष्णू मनोहर यांनी 7 हजार किलोची महामिसळ तयार केली. याअगोदर लोकांच्या उपस्थितीत विश्व विक्रम झाले. पण, हा विश्वविक्रम लोकांच्या अनुपस्थित कोरोनाच्या नियमांचे पालन करून झाल्याने एक वेगळाचं अनुभव वाटतो आहे, अशी भावना शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केली.

सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमचे विद्यार्थी, सूर्यदत्तामधील सर्वच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विश्वविक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी शेफ विष्णू मनोहर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रा. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया आदी उपस्थित होते.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details