पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली, अशी चर्चा आहे. शरद पवार एका कार्यक्रमासाठी अहमदाबादला गेले होते. अमित शाह हेदेखील प्रवासातून घरी गेले होते. त्यामुळे त्यांची भेट झाली असेल याबद्दल दुजोरा मिळत आहे. परंतु, ही भेट झालीच नाही असे सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात स्पर्धा लागली आहे. यातूनच भेट झाली आहे, असे दिसून येते. मात्र, या बैठकीबाबत आणि त्यांच्यातील चर्चेबाबत मी देखील अनभिज्ञ असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांनी आज(सोमवार) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघातील काही प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
प्रत्येक भेट राजकारणासाठी नसते -
अशा प्रकारच्या भेटी नियमितपणे होत असतात. राजकारणा व्यतिरिक्तही आपण भेटले पाहिजे. राजकारण राजकारणाच्या जागी आणि मैत्रीचे संबंध आपल्या जागी, असे भारतीय संस्कृती आपल्याला सांगते. परंतु, अलीकडच्या काळात महाराष्ट्रत अशा भेटीगाठी कमी झाल्या आहेत. विरोधक आणि सत्ताधारी हे वैऱ्यांसारखे वागत आहेत. त्यामुळे पवार आणि शाह यांच्या भेटीला देखील संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. भेट झाली म्हणजे ती राजकीय चर्चेसाठीच झाली असे म्हणता येणार नाही, असे पाटील म्हणाले.