सांगली - संगणकीकरणामुळे सरकारी नोकऱया कमी होत चालल्या आहेत. त्यामुळे तरुण-तरुणींनी सरकारी नोकरीचे खूळ डोक्यातून काढून टाकले पाहिजे. तरुणांनी स्वतः रोजगार निर्माण केले पाहिजेत असे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. सांगली महापालिकेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत मोफत नोकरी कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मेळावा रविवारी सांगलीमध्ये आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्याचा समारोप राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. याप्रसंगी महापालिका क्षेत्रातील बचत गटांना कर्जपुरवठा धनादेशाचे वाटप पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. तसेच, रोजगार मेळावादरम्यान नोकरी मिळालेल्या तरुण-तरुणींना निवडीचे पत्र मंत्री पाटील यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या प्रसंगी बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तरुण-तरुणींनी सरकारी नोकरी ही कल्पना डोक्यातून काढून टाकली पाहिजे, असे सांगितले. दिवसेंदिवस सरकारी नोकऱया कमी होत चालले आहेत. आणि दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारी नोकरी मिळणे कठीण आहे, असे ते म्हणाले.