पुणे - आज (रविवार) दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही झालं तरी कायदा रद्द होणार नाही. त्यात फक्त बदल केला जाईल. सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून कायदा तयार केला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन येथील आंबेडकर पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. तेव्हा ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी कायदा रद्द होणार नसल्याचे ठणकावून सांगितले. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल करण्यात आलेले नाही. जे जुन्या कायद्यात होतं तेच आहे. फक्त आत्ता या कायद्यामुळे शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर शेतमाल विकण्याची परवानगी मिळाली आहे. प्रश्न फक्त किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) होता. तर त्याप्रकरणी केंद्र सरकार एमएसपी देण्याचे लेखी मान्य करायला तयार आहे. तरीही आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार, या भूमिकेला काहीही अर्थ नाही. केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही. फक्त कायद्यात बदल केला जाईल, असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
विरोधक राष्ट्रपतींची भेट घेत असतील तर त्यांचे स्वागत -
देशात करण्यात आलेल्या कृषी कायद्यावरून विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना शुभेच्छा दिल्या. लोकशाहीत कोणीही पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची भेट घेऊ शकतो. विरोधी पक्षातील नेते भेट घेत असतील, तर त्यांचे स्वागत आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.