महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मराठा आरक्षणाचे मातेरे तर शिक्षण क्षेत्राचा बट्याबोळ'; चंद्रकांत पाटील यांची टीका

तेरा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नको ते लोक एकत्र आलेत. सर्वात जास्त आमदार निवडून येऊनही भाजपा विरोधी पक्षात राहिला. त्या सरकारला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

By

Published : Nov 29, 2020, 3:20 PM IST

पुणे - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या वर्षपूर्तीवर टीका केली. तेरा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नको ते लोक एकत्र आलेत. सर्वात जास्त आमदार निवडून येऊनही भाजपा विरोधी पक्षात राहिला. त्या सरकारला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

एक वर्षात सामान्य माणूस पूर्णपणे भरडला गेला आहे. महिला अत्याचार, मराठा आरक्षण गोंधळ असा सर्व प्रकार या सरकारच्या काळात पाहायला मिळाला. कोरोनाचे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे. जगातले पाच देश सोडले तर सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रत आहे. कोरोनाकाळात आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आणि सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ -

सरकारच्या काळात सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. तसेच शिक्षण क्षेत्राचाही बट्ट्याबोळ झाला आहे. कोणी म्हणतं आज शाळा सुरू होईल, कोणी म्हणते होणार नाही. तोच गोंधळ आता दहावीच्या परीक्षेवरून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राची अवस्था वाईट झाली आहे, असं देखील ते म्हणाले.

मराठा आरक्षणाचे मातेरे -

सरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे करून टाकले. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कष्टाने आरक्षण मिळून दिले होते. पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. शिक्षणातील आरक्षण यांनी आता रद्द केले. या सरकारने मराठा आरक्षणावरून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम केले, असा आरोप त्यांनी केला आहे.

संजय राऊत मोठे व्यक्तिमत्त्व -

संजय राऊत यांच्याबद्दल मी अलीकडे बोलणे बंद केले आहे. ते खूप मोठे व्यक्तिमत्त्व आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली. तसेच आजवर महाराष्ट्राच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांने अशी भाषा वापरली नाही. आम्ही कोणालाही घाबरत नाहीत. त्यांना काय करायचे ते करावे, आम्ही लोकांच्या प्रश्नांवर बोलत राहणार, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा -भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची पत्रकार परिषद..

ABOUT THE AUTHOR

...view details