पुणे - शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली. हे 'हम करे सो कायदा', असा प्रकार आहे. राज्यात शिवसेनेची दादागिरी सुरू आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शिवसेनेच्या विरोधात कोणी आवाज काढायचा नाही. मग, तो पत्रकार असो, नागरिक असो की, माजी नौदल अधिकारी. केवळ यांची स्तुती करा, असा टोला पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे. पाटील पिंपरीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
'हम करे सो कायदा' अशी राज्याची स्थिती - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील शिवसेना टीका
कांदिवली पूर्व येथे राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना काल शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी शिवसेना आणि राज्य शासनावर जोरदार टीका सुरू केली आहे.
राज्य सरकारच्या विरोधात पत्रकारांनी, नागरिकांनी, निवृत्त सैनिकांनी आवाज काढायचा नाही, फक्त यांची स्तुती करा. अशी स्तुती तुमच्या भोवती असणारे लोक करतीलच की नागरिकांनी कशाला करायची? जर नागरिकांनीही आपली स्तुती करावी असे वाटत असेल तर त्यासाठी काम करा, असा सल्ला पाटील यांनी सरकारला दिला.
सुशांतसिंह प्रकरणी राज्य सरकारने 45 दिवस गुन्हा दाखल करून घेतला नाही. सीबीआयच्या तपासाला विरोध केला. यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात संशय निर्माण झाला आहे. याला विरोध करण्याचे काही कारण नव्हते. उलट राज्य शासनाने म्हटले पाहिजे की लवकरात लवकर या प्रकरणाचा शोध लावा. मात्र, त्यांनी सीबीआय चौकशीला टोकाचा विरोध केला. यामुळे 'दाल में कुछ काला है!' अशी चर्चा तर नक्कीच रंगणार, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.