पुणे-जयंत पाटील यांनी फुकटात मिळालेली सत्ता हजम करावी, आमची चिंता करू नये. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून चार वर्षे काम करतच राहू, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजपने आता चार वर्षे विरोधातच बसावे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली होती. त्यावर उत्तर देतांना फुकटात मिळालेली सत्ता जयंत पाटलांनी हजम करावी. ही सत्ता कशी टिकवता येईल याचा त्यांनी विचार करावा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पुण्यामध्ये भाजपच्या पदवीधर मतदारसंघासाठीचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्यासाठी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते.
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी महाराष्ट्राचा पॅटर्न राबवावा, असा सल्ला देणाऱ्या संजय राऊत यांच्यावर देखील चंद्रकांत पाटील यांनी बोचरी टीका केली. संजय राऊत यांना सल्ला देण्यासाठी दिल्लीला बोलून घेतले पाहिजे. तसेच, सल्ला देण्यासाठी त्यांना अमेरिकेला देखील पाठवायला पाहिजे. तिकिटाची व्यवस्था आम्ही करू, अशी टीका पाटील यांनी केली.
सरकार सगळ्याच विषयात कन्फ्यूज
राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना, एकूणच या सरकारने नवीन कुठलीही गोष्ट सुरू केली नाही. जुने जे फडणवीस सरकारने सुरू केले, ते बंद करायचे काम विद्यमान सरकार करत आहे. सरकार कुठल्याच विषयावर गंभीर नाही. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, अशा सगळ्या विषयात हे सरकार कन्फ्यूज आहे, अशी टीका पाटील यांनी केली. तसेच, हे सरकार वैयक्तिक पातळीवर येऊन काम करत आहे. अशा पद्धतीने काम करणार असतील तर राज्य कसे चालेल, असे देखील पाटील म्हणाले.
दरम्यान, पदवीधर निवडणुकीबाबत बोलताना, प्रत्येक निवडणुकीत चॅलेंज असतो. या निवडणुकीतही चॅलेंज आहे. मात्र, तरीही आम्ही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सहज जिंकू, असा दावा पाटील यांनी केला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी यापूर्वी आम्ही चांगले काम केले आहे. या पुढेही कौशल्य विकासावर आम्ही अधिक काम करू. सरकारी खात्यात रिकाम्या जागा भरण्यासाठी प्रयत्न करू. बेरोजगारांना नोकरी मिळेपर्यंत बेरोजगार भत्ता कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करू, असे पाटील म्हणाले.
हेही वाचा-बोरिपार्धीमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी, सुमारे ४ लाखाचे सोने-रोकड लंपास