पुणे :रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मी फारसा इच्छुक नाही. मात्र पक्षानं आदेश दिल्यास मी जबाबदारी पार पाडेल, असं राष्ट्रवादीचं आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपानेही प्रत्युत्तर दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेखर बावनकुळे म्हणाले की, रावेरात कोणी उभे राहीले तरी रक्षा खडसेंचा दोन लाख मतांनी विजय होणार असल्याचं वक्तव्य बावनकुळे यांनी केलंय. ते आज पुण्यात बोलत होते.
रक्षा खडसेच विजयी होणार :चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे रावेरमधून लढले तरी, त्या निवडणुकीत रक्षा खडसेच जिंकतील. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात आमच्या सर्व खासदारांनी उत्तम काम केलं आहे. रक्षा खडसे यांनीही मतदारसंघात चांगलं काम केलं आहे. त्या मतदारसंघात फिरल्या आहेत. त्यामुळं रावेरमध्ये कोणीही लढले तरी रक्षा खडसे विजयी होणार असल्याचा दावा बावनकुळे यांनी केलाय.
खडसेंना उभं करण्याची तयारी: राष्ट्रवादी काँग्रेसनं रावेर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक विधान केलंय आहे. राष्ट्रवादीच्या जळगाव सभेत जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उद्देशून रावेर लोकसभेचे धनुष्यबाण हाती घ्या, असे सांगितलं होतं. तर, एकनाथ खडसे यांनीही जयंत पाटलांच्या विनंतीला अनुकूलता दर्शवली आहे. आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, मी लोकसभा निवडणूक लढवण्यास फारसा इच्छुक नाही. पण, पक्षानं जबाबदारी दिली तर ती जबाबदारी पार पाडेन असं ते म्हणाले होते.
पक्षानं संधी दिल्यास विचार करणार : एकनाथ खडसे म्हणाले, रावेर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 1989 मध्ये झाली. तेव्हापासून रावेरमध्ये पोटनिवडणुकीसह एकूण 10 निवडणुका झाल्या आहेत. यापैकी ९ वेळा काँग्रेसचा पराभव झाला आहे. काँग्रेसनं केवळ एकच निवडणूक जिंकली आहे. एकेकाळी हा मतदारसंघ केवळ 13 महिने काँग्रेसकडं होता. ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्या पक्षानं दिलेल्या संधीचा विचार करेन असं खडसे म्हणाले होते.