चाकण (पुणे)- चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये लॉकडाऊनपासून अनेक छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय संकटाचा सामना करत आहेत. कामगारांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. त्यातच आता चाकण औद्योगिक वसाहत कोरोना हॉटस्पॉट झाल्याने रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
उद्योग व्यवसाय संकटात येऊन कामगारवर्ग अडचणीत येत चालला आहे. मात्र, उद्योग व्यवसायांना या संकटातून वेळीच बाहेर काढून कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे गट विकास अधिकारी अजय जोशी यांनी सांगितले.
चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये 450 पेक्षा जास्त छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू आहेत. यामध्ये 7 लाखांपर्यंत कामगार वर्ग काम करत होता. मात्र, सध्या कोरोना महामारीच्या काळात 3 लाखांपर्यंत कामगार काम करत आहेत. त्यात काही छोटे उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कामगारांची कपात, लॉकडाऊनचा परिणाम, कमी उत्पादन, उद्योगांवरील कर्ज-व्याज यामुळे उद्योजक संकटात आहेत. अशातच खेड तालुक्यात 1860 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 1504 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने औद्योगिक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.
लॉकडाऊननंतर चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शन सूचनांनुसार सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे, सँनिटायझिंगचा वापर करणे अशा इतर नियमांना आधीन राहुन उद्योग व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, अजून अनेक उद्योगांमध्ये नियमांचे पालन केले जात नसल्याने कोरोनाचा समूह संसर्ग वाढत असून कामगारवर्ग कोरोनाच्या भीतीच्या छायेखाली काम करत आहे. तर काही कामगारांना कोरोनाची लागण होऊन मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आपली नोकरी वाचविण्यासाठी जीव मुठीत धरुन काम करावे लागत असल्याचे कामगारांनी सांगितले.
कामगारांना भीतीच्या वातावरणात काम करावे लागत आहे, तर दुसरीकडे कामगार वर्ग संघटित होऊन आवाज उठवू लागल्यावर त्यांच्या नोकरीवर गदा येऊ लागली आहे. अशा विविध संकटात चाकण औद्योगिक वसाहत सुरू आहे. या सर्व संकटावर मात करण्यासाठी प्रशासकिय आधिकारी काम करत आहेत. मात्र, उद्योजकांनी पुढील काळात शासकिय नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी तर कोरोना महामारीच्या संकटावर यशस्वी मात करण्यात लवकर यश मिळेल, अशी आशा गट विकास अधिकारी अजय जोशी यांनी व्यक्त केली.