पुणे - पिंपरी चिंचवड परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन चाकण नगरपरिषदेने शहर परिसरातील सीमा बंद केल्या असून बाजार समितीला देखील टाळे ठोकले आहे. आडतदारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट आहे.
चाकणमध्ये अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली छोट्या-मोठ्या वाहनांना स्टिकर लावून अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरत असतात. लॉकडाऊन असतानाही लोक गर्दी करतात. असे प्रकार टाळण्यासाठी चाकण नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंची होम डिलीव्हरी स्वीकारण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.नीलम पाटील, नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष ऋषिकेश झगडे यांनी म्हटले आहे.
चाकणच्या सीमा सील; कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळं
पिंपरी चिंचवड परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन चाकण नगरपरिषदेने शहर परिसरातील सीमा बंद केल्या असून बाजार समितीला देखील टाळे ठोकले आहे.
चाकणमधील सर्व रस्ते आजपासून सील करण्यात आले आहेत. माणिक चौक, आंबेठाण चौक, जय भारत चौक, तळेगाव चौक, चक्रेश्वर रस्ता, वाघे वस्ती, आंबेडकर नगर, आदी ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलीय. यासाठी जागोजागी पोलिसांसह चाकण नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
चाकण मार्केट बेमुदत काळासाठी बंद
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे चाकण येथील महात्मा फुले मार्केट बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी मोठी गर्दी होत होती. अन्य भागातून व्यापारी व विक्रेते आपला माल विकण्यासाठी बाजारपेठेत येत होते. मात्र, आता कृषी उत्पन्न बाजार समिती अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.