बारामती (पुणे)- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकातील दोन सदस्यांनी आज बारामतीला भेट दिली. बारामतीत प्रशासनाने राबवलेल्या 'बारामती पॅटर्न'ची माहिती घेऊन या सदस्यांनी कोरोनाबाधित क्षेत्रात जाऊन माहिती घेतली. कोरोनावर मात करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
आज दुपारी 12 वाजता डॉ. अरविंद अलोणी, डॉ. पी. के सेन हे दोन केंद्रीय समितीचे सदस्य बारामतीत दाखल झाले. त्यांनी बारामती शहरातील कोरोनाबाधित भागाला भेट दिली. त्यानंतर ते येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले व येथील स्थितीची माहिती घेतली. सिल्वर ज्युबिली रुग्णालयाचे डॉ. सदानंद काळे, डॉ. मनोज खोमणे यांनी सदस्यांना सविस्तर माहिती दिली.
या केंद्रीय पथकाकडून ज्या भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. अशा भागात प्रशासन, पोलीस, आरोग्य विभागासह आदी विभागांंकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी अमृता नाटेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सिल्वर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील उपस्थित होते.
केंद्रीय पथकाने केले बारामतीचे कौतुक
बारामतीसारख्या ग्रामीण भागात कोरोनावर मात करण्यासाठी उत्तम नियोजन केले आहे. याबाबत केंद्रीय समितीतील डॉ. अरविंद अलोणी, डॉ. पी. के सेन यांनी समाधान व्यक्त केले. उत्तम प्रकारे उपाययोजना राबविल्या जात असल्याचे कौतुक केले.